केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करणारे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांना ‘पाणी पाजून’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांत केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयात सीबीआयने कथित छापे मारल्याचा आरोप करून आप खासदार भगवंत मान लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर घोषणाबाजी करीत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मान यांनी पंतप्रधानांकडे पाठ फिरवून त्यांच्याच विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
काही वेळाने त्यांच्या घशाला कोरड पडली. महाजन यांच्या आसनासमोरील जागेत बसणाऱ्या अधिकाऱ्यांना मान यांनी खुणेनेच पाणी विचारले. तेथे पाणी उपलब्ध नव्हते. तेव्हा नजरानजर होताच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासमोरील पाण्याचा ग्लास मान यांना दिला. पाणी पिल्याने शांत झालेल्या मान यांनी नव्याने घोषणाबाजी सुरू केली.
मोदींच्या या ‘पाणी’ डिप्लोमसीमुळे सत्ताधाऱ्यांना सुखद धक्का बसला. काही खासदारांनी बाके वाजवली. तर झालेला प्रकार कळल्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही हसू आवरले नाही.
केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने छापे टाकल्याने आम आदमी पक्षाच्या मदतीला तृणमूल काँग्रेसचे सदस्य धावून आले. तृणमूलच्या सुदीप बंदोपाध्याय यांनी केंद्र सरकारची ही कृती सुडाचे राजकारण ठरवली.
ते म्हणाले की, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला विश्वासात न घेता त्याच्या कार्यालयावर सरकारने छापे टाकले. विरोधी बाकावर असताना सीबीआयला ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ असे हिणवणाऱ्या भाजपने सीबीआयचे ‘गुजरात ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ केल्याची टीका बंदोपाध्याय यांनी केली. त्यास प्रत्युत्तरादाखल नायडू यांनी आम आदमी पक्षाने सीबीआयने कारवाईपूर्वी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करण्याचे समर्थन करणारे पत्रकच सादर केले. दोनेक वर्षांपूर्वीच्या या पत्राची प्रत दिसताच तृणमूल सदस्य शांत बसले.