सध्या संपूर्ण जगभरात ‘केंब्रिज अॅनालिटिका’ या अमेरिकन कंपनीने कोणतीही परवनागी न घेता फेसबुक युजर्सचा डेटा चोरल्याचं प्रकरण गाजत असताना काँग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजपाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरुन डेटा चोरला जात असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीका करत विनापरवानगी डेटा चोरीचा आरोप केला आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मोदींचं नमो अॅप गुप्तपणे तुमच्या मित्र आणि नातेवाईंकांचं ऑडिओ, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक रेकॉर्ड करतो’. ‘नरेंद्र मोदी बिग बॉस आहेत ज्यांना भारतीयांची हेरगिरी करायला आवडतं’, अशी टीका यावेळी राहुल गांधींनी केली आहे. पुढे ते बोललेत की, ‘आता त्यांना आपल्या मुलांचाही डेटा हवा आहे. १३ लाख एनसीसी कॅडेट्सना नमो अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे’. राहुल गांधींनी ट्विटमध्ये #DeleteNaMoApp हा हॅशटॅगही वापरला आहे.

याआधीही राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘मी नरेंद्र मोदी, आपला सर्व डेटा अमेरिकन कंपन्यांतील आपल्या मित्रांना देत आहे.’ अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी रविवारी केले होते. काँग्रेसने नमो अॅपवरुन भारतीयांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा गंभीर आरोप करीत सोशल मीडियावर #DeleteNaMoApp ही मोहिमही चालवली आहे.

नरेंद्र मोदी अॅप मोबाईलच्या अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक लोकांकडून हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेसच्या आरोपांचे खंडन केले आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करुन सांगतिले की, काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच नव्हे तर त्यांच्या अॅपला देखील घाबरली आहे.