पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतत आहेत. कॅनडावरून स्वदेशी परतण्यासाठी निघालेल्या मोदींनी टि्वटरच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात कॅनडाचे पंतप्रधान हार्पर यांच्या पाहुणचाराचे कौतुक करीत एक उत्तम व्यक्तिमत्व आणि चांगला मित्र अशा शब्दात त्यांची प्रशंसा केली. याचबरोबर कॅनडाच्या जनतेचे आभार मानत हा दौरा भारत आणि कॅनडाच्या संबंधांना वृद्धिंगत करेल, असा विश्वास व्यक्त केला. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत देशाच्या विकासासाठी भांडवल आणि तंत्रज्ञानाची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधानांच्या या दौऱ्यात विशेष भर देण्यात आला. तीन देशांच्या या दौऱ्यादरम्यान फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमानांचा करार, तर जर्मानीमधील दौऱ्यात हनोवर मेळाव्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. या मेळाव्यात भारत एक प्रमूख भागीदार देश म्हणून सहभागी झाला होता. मेळाव्याचे शीर्षक ‘मेक इन इंडिया’ असे ठेवण्यात आले होते. कॅनडाबरोबर युरेनियम करारासह अन्य महत्वपूर्ण करार करण्यात आले.
पंतप्रधानांच्या नऊ दिवसांच्या दीर्घ प्रवासाची सुरुवात फ्रान्सपासून झाली. पॅरिसमध्ये त्यांनी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलॉंद आणि काही व्यावसायिकांची भेट घेतली. फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील जैतापूर येथील अणूऊर्जा प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर, जर्मनीला जाऊन पंतप्रधानांनी जर्मनीच्या चान्सेलर एंजला मर्केल यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील गुंतवणूक आणि व्यापारासाठी एक योजना आखण्यात आल्याची घोषणा त्यांनी येथे केली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय आर्थिक सहायाच्या विस्तारासाठी संमती दर्शवली.
पंतुप्रधानांच्या नऊ दिवसीय दौऱ्याचा अंतिम मुक्काम कॅनडामध्ये होता. टोरांटो आणि वेंकुव्हरमध्ये त्यांनी व्यावसायिकांची भेट घेतली. ओटावामध्ये त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान हार्पर यांची भेट घेतली. कॅनडाबरोबरच्या २५ कोटी ४० लाख डॉलरच्या पंचवार्षिक कराराद्वारे या वर्षापासून भारतीय अणुभट्ट्यांसाठी भारताला तीन हजार मेट्रिक टन युरेनियमचा पुरवठा करण्याचे ठरले.