लिट्टीचोखा आणि कुल्हड चहाचा आस्वाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक येथील राजपथावर हुनरहाटला भेट देऊन तेथील कलाकारांशी हितगुज केले. त्यांनी लिट्टीचोखा आणि कुल्हड चहाचा आस्वादही घेतला.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी राजपथावरील हुनर हाटकडे आपला मोर्चा वळवला.  हुनरहाटचे आयोजन अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाने केले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांची अशी भेट ठरलेली नव्हती त्यांनी अचानकच हुनरहाटला भेट दिली. मोदी सुमारे पन्नास मिनिटे तेथे होते. त्यांनी लिट्टीचोखाचा आस्वाद घेतला. लिट्टीचोखा हा गव्हाच्या पिठाच्या गोळ्यात सत्तू भरून केलेला एक पदार्थ असतो. त्यासाठी पंतप्रधानांनी १२० रुपये मोजले. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश व झारखंडमध्ये हा पदार्थ विशेष लोकप्रिय आहे. नंतर त्यांनी अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याबरोबर कुल्हडमधून चहा घेतला त्यासाठी त्यांनी दोघांचे मिळून चाळीस रुपये दिले. हुनरहाटमध्ये सहभागी कलाकारांनी सांगितले की, पारंपरिक कला अखेरच्या घटका मोजत आहेत. पण हुनरहाटने त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कौशल को काम’ योजनेत ‘हुनरहाट’ नावाचे बाजार भरवले जातात. आताचा राजपथावरील हुनरहाट २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. कलाकार व इतर दुकानदारात पन्नास टक्के महिलांचा समावेश आहे. बावर्चीखाना विभागात भारतातील सर्व प्रकारच्या पारंपरिक पदार्थाना स्थान मिळाले आहे. भारताच्या इतर भागातही असे हुनरहाट आयोजित केले जातात.