नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शंभर रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण झाले. संसदेच्या छोटय़ा सभागृहात सोमवारी झालेल्या छोटेखानी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वाजपेयींचे मित्र आणि सहकारीही उपस्थित होते.

‘‘वाजपेयी आपल्यात नाहीत ही कल्पनाच करता येत नाही,’’ असे म्हणत मोदींनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम संपल्यावर मोदींचा मराठमोळा नूर वाजपेयींच्या जुन्या मित्रांना पाहायला मिळाला.

वाजपेयींच्या नाण्याचे अनावरण करून मोदी व्यासपीठावरून खाली उतरून आले. त्यांनी वाजपेयींचे पाच दशके स्वीय सचिव राहिलेल्या शिवकुमार पारिख यांच्याकडे जाऊन आपुलकीने विचारपूस केली.

वाजपेयींचे मानसपुत्र रंजन भट्टाचार्य यांच्या खांद्यावर थाप टाकत दिलखुलास गप्पा मारल्या. तेवढय़ात त्यांचे लक्ष वाजपेयींचे पन्नासच्या दशकापासूनचे जुने मित्र एन. एम. अर्थात अप्पाजी घटाटे यांच्याकडे गेले. मोदींनी घटाटेंशी मराठीत गप्पा मारायला सुरुवात केली. ‘‘घटाटेजी, कसे आहात? वैनी कुठे आहेत?.. गुजरातला जाऊन आलात का? सरदारांचा पुतळा एकदा बघून या’’.. अप्पाजी घटाटे आणि त्यांच्या पत्नी शीला घटाटे यांची वाजपेयींशी घनिष्ठ मैत्री होती.

अगदी वाजपेयींच्या शेवटच्या काळातही घटाटे कुटुंब वाजपेयींच्या संपर्कात होते. इंदिरा गांधींना वाजपेयींनी कधीच ‘दुर्गा’ म्हटले नव्हते आणि नेहरूंनी वाजपेयींना ‘भावी पंतप्रधान’ असे कधीच संबोधले नव्हते. या दोन्ही बाबी घटाटेंनीच पहिल्यांदा स्पष्ट केल्या होत्या. या मराठी घटाटे दाम्पत्याची मोदींनी आस्थेने चौकशी केली.

घटाटेंच्या जवळच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उभ्या होत्या. त्यांनाही नमस्कार करीत मोदींनी सुमित्राताईंचीही मराठीतून विचारपूस केली. ‘‘ताई, कशा आहात. बरं आहे ना सगळं?.. मी निघतो आता. मला भुवनेश्वरला जायचं आहे,’’ असे म्हणत मोदींनी सुमित्रा महाजन यांचा निरोप घेतला. पंतप्रधान निघत असल्याचे पाहून लालकृष्ण अडवाणी उठून उभे राहिले. त्यांनाही मोदी हसून म्हणाले की, ‘बैठिये.. बैठिये अडवाणीजी!’’

काँग्रेसवर टीका

काहींसाठी सत्ता हीच ऑक्सिजन असते. त्यांना सत्तेशिवाय जगताच येत नाही. वाजपेयींची बहुतांश राजकीय कारकीर्द विरोधी पक्षातच गेली. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रहिताचे मुद्दे उपस्थित केले, असे सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली. अटलजींनी लोकशाहीला सर्वोच्च मानले. त्यांनी जनसंघाला उभे केले; पण लोकशाही वाचवण्याची वेळ आली तेव्हा देशाच्या हितासाठी वाजपेयी जनता पक्षाचे भाग बनले. सत्ता आणि विचार यांच्यात एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जनता पक्ष सोडला आणि भाजपची स्थापना केली, असे मोदी म्हणाले.