अभियानाच्या सरकारीकरणावर मोदी नाराज; परमेश्वरन अय्यर यांच्यावर जबाबदारी
सत्तास्थापनेनंतर पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात घोषणा करून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करून दाखवण्यासाठी एका निवृत्त आएयएस अधिकाऱ्याला पुन्हा सचिवपदी नेमण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या परमेश्वरन अय्यर यांना पेयजल व सांडपणी व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे. सेवेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्याऐवजी एका निवृत्त अधिकाऱ्याला सचिवपदी यापूर्वी नेमण्यात आले नसल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता व ‘स्वच्छ भारत’ आभियानाचे झालेले सरकारीकरण असे दोन अर्थ नोकरशाहीच्या वर्तुळातून परमेश्वरन यांच्या नियुक्तीनंतर लावण्यात येत आहेत. परमेश्वरन अय्यर यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परमेश्वरन यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. १९८१ साली आयएएस झालेल्या परमेश्वरन यांनी २००९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रमुखपदी रूजू झाले. उत्तर प्रदेशमध्ये परमेश्वरन यांनी जल सुराग अभियान राबवले होते. त्यांना पाणी, सांडपाणी व्यवस्थापनातील सुमारे वीस वर्षांचा अनुभव आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू झाल्यानंतर झाडून केंद्रीय मंत्री, भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे मोठे नेते हातात झाडू घेवून रस्ता स्वच्छ करताना दिसत होते. या अभियानास ठळक प्रसिद्धी मिळाली होती.
सामान्य नागरिकांकडून स्वच्छ भारत कर वसूलण्यास सुरूवात झाली. परंतु तरिही मोदी मात्र या अभियानाच्या ठोकळेबाज प्रचारावर असमाधानी होते. त्यामुळेच त्यांना परमेश्वरन यांना परत बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली.