उत्तर प्रदेशातील आतापर्यंतच्या सभांमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सातत्याने राम मंदिराचा उल्लेख टाळला आहे. मात्र येथील सभेत रामराज्याचा उल्लेख करत, उत्तर प्रदेशच्या जनतेने जर योग्य पक्षाला निवडून दिले तर रामराज्य येऊ शकते, असे भावनिक आवाहन मोदींनी केले.
उत्तर प्रदेशला रामराज्याची गरज आहे असे सांगत मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका केली. या राज्यात ज्या समस्या आहेत, त्या योग्य व्यक्ती निवडून न दिल्याने आहेत. मात्र तुमच्यावर पूर्ण विश्वास असून, एक दिवस तुम्ही योग्य सरकार निवडून द्याल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी गंगा स्वच्छता अभियानाचा मुद्दा उपस्थित केला. गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंब जबाबदार असल्याची टीका मोदींनी केली. आम्ही जनतेची कधीच दिशाभूल करत नाही. काँग्रेसच आश्वासने पाळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदींनी ठेवला. गंगा शुद्धीकरण योजनेवर किती पैसे खर्च झाले, हे काँग्रेसने जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले.