पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरुन काँग्रेसने टीका केली आहे. नरेंद्र मोदी सत्तेतून गेल्याशिवाय देशात ‘सच्चे दिन’ येणार नाही. आता देशातील जनतेला ‘सच्चे दिना’ची प्रतीक्षा आहे, अशा शब्दात काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. भाषणात मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. काँग्रेसच्या काळात संथगतीने काम व्हायचे. गेल्या चार वर्षांत मोदी सरकारच्या काळात विकासाची कामे वेगाने झाली, असे मोदींनी म्हटले होते. गेल्या चार वर्षांत सरकारने केलेल्या कामांची आकडेवारीही त्यांनी याप्रसंगी सादर केली.  या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, मोदींनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या शेवटच्या भाषणात तरी खरे बोलले पाहिजे होते. ‘मन की बात’ ते करत नाही. किमान देशहिताबाबत त्यांनी भाष्य केले पाहिजे होते. देशात अच्छे दिन तर आले नाही. आता देशवासीयांना सच्चे दिनाची प्रतीक्षा असून मोदी सत्तेतून गेल्याशिवाय देशात सच्चे दिन येणार नाही, असे त्यांनी सांगितले.