उत्तराखंडमधील जलप्रकोपात अडकलेल्या सर्व नागरिकांची सुटका अजून झालेली नसतानाच त्यावरून राजकारण पेटण्यास सुरुवात झालीये. नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱयावर कॉंग्रेसने टीका केली. 
दोन दिवसांत मोदी यांनी सुमारे १५ हजार गुजराती नागरिकांची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका केल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यावरून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आणि कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी मोदींना लक्ष्य केले. मोदींना रॅम्बो बनायचंय, या शब्दांमध्ये तिवारी यांनी मोदींचे थेट नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली. त्याचबरोबर मोदी यांनी दोन दिवसांत उत्तराखंडमधून १५ हजार गुजराती नागरिकांची सुटका केल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले.
उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीचा मोदी राजकीय फायदा घेत असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. तिवारी म्हणाले, काही नेते दोन दिवस उत्तराखंडमध्ये जाऊन तिथून हजारो नागरिकांची सुटका केल्याच्या दंतकथा रचण्यात सध्या मश्गूल आहेत.
दरम्यान, मोदींवर होणाऱया टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय आपत्तीवेळी विरोधकांनी काही करायचे ठरवले, तर त्यांच्यावर कॉंग्रेसकडून कायमच टीका होत आलीये, असे नक्वी यांनी सांगितले.