काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करार हे भ्रष्टाचाराचं ओपन अॅण्ड शट प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. सोबतच जर याप्रकरणी चौकशी सुरु झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेलमध्ये जावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. काही ठराविक वरिष्ठ पत्रकारांसोबत राहुल गांधींची बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘चौकीदार चोर है’ म्हणणं लोकांना पटत असेल असं वाटतं का विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींना भ्रष्टाचारी म्हटलं जात नाही, तर ते भ्रष्टाचारी आहेत. उगाच गोंधळू नका. राफेल हे ओपन अॅण्ड शट प्रकरण आहे. ज्यादिवशी राफेल प्रकरणी तपास सुरु होईल, त्यानंतर काही वेळातच नरेंद्र मोदी जेलमध्ये असतील’.

फ्रान्समध्ये राफेल प्रकरणी तपासाला सुरुवात झाली असल्याचं सांगताना नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना फायदा पोहोचवण्यासाठी प्रक्रिया आणि सर्व कायद्यांचं उल्लंघने केल्याची टीका राहुल गांधींनी केली.

‘त्यांना माहित आहे की राफेल प्रकरणी चौकशी सुरु झाली तर जी कागदपत्र समोर येतील त्यावर दोनच नावं असतील ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी. आता फक्त निवडणूक जिंकणं नाही तर स्वत:ला वाचवण्याचाही प्रयत्न सुरु आहे. यामुळे रात्री 2 वाजता सीबीआय प्रमुखांना हटवण्यात आलं’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यावेळी राहुल गांधी यांना शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावर त्यांची काय भूमिका आहे असं विचारण्यात आलं. यावर राहुल गांधींनी, ‘महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिला पाहिजे. त्यांना प्रत्येक ठिकाणी जाण्याची परवानगी असली पाहिजे’, असं सांगितलं.