नासाने नवा कॅमेरा विकसित केला असून तो परग्रहावरील खडकांची नुसती छायाचित्रेच घेत नाही तर त्याचा अर्थही लावून दाखवतो, ग्रहांवर पाठवण्यात आलेल्या रोव्हर गाडय़ांवर या कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. सध्या मंगळावर पाठवण्यात आलेल्या रोव्हर गाडीवर कॅमरे आहेत पण त्यांच्यापेक्षा अधिक सुविधा असलेला हा कॅमेरा आहे. त्याने दूरच्या ग्रहांची माहिती अधिक चांगली मिळणार आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
व्ॉगस्टाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन भिंग असलेला हा टेक्स्चरकॅम बनवला असून तो अतिशय कमी वेळात कुठल्याही संदेशानुसार कृती करतो. छायाचित्रे काढतो व त्याचा अन्वयार्थ लावून दाखवतो. क्युरिऑसिटी व इतर रोव्हर गाडय़ांवरील कॅमेरे छायाचित्रे काढतात पण त्यांचा अर्थ लावण्यासाठी ती पृथ्वीवर पाठवली जातात. ही प्रक्रिया कालहरण करणारी व खर्चीकही आहे. टेक्स्चर कॅम हा नवीन प्रकारचा कॅमेरा रोव्हरवर लावल्यावर तो छायाचित्रांचा अर्थही लावू शकेल. मंगळावरील दिवसाला सोल असे म्हणतात, त्या अनुषंगाने पृथ्वीवरील वैज्ञानिक या कॅमेऱ्याला कामे ठरवून देऊ शकतात. गाडी पुढे नेणे, छायाचित्र काढणे, मातीचे नमुने घेणे, चाचण्या करणे व पुढे जाणे असा काहीसा कार्यक्रम असू शकतो. प्रकाश वेगाने संदेश पाठवला, तरी तो मंगळापर्यंत पोहोचण्यास २० मिनिटे लागतात. त्यामुळे संदेश देवाण घेवाणीचा ४० मिनिटांचा काळ गृहीत धरला, तर रोव्हर गाडीचे नियंत्रण अवघड जाते. मंगळ-पृथ्वी यांच्यातील संदेशवहन विचारात घेतले, तर मंगळावरून येणारा संदेश सेकंदाला ०.०१२ मेगाबिट तरंगलांबीचा असतो व ती थ्री जी मोबाइल नेटवर्कच्या २५० पट कमी वेगवान आहे.