|| महेश सरलष्कर

भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी पुन्हा जुळवाजुळव सुरू केली आहे. पीडीपीशी काडीमोड घेतल्यानंतर आता नॅशनल कॉन्फरन्सबरोबर संसार थाटण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसे संकेत भाजपचे जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

वाजपेयी सरकारमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सहभागी होता. पीडीपीशी युती करूनही भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवले होते. त्यामुळे पुन्हा सरकार बनवणे शक्य असेल तर भाजप तसा प्रयत्न करेल. सत्तेसाठी कोणता पक्ष आमच्या बरोबर येईल हे पाहायचे, असे रैना यांनी सांगत नव्या राजकीय समीकरणाची शक्यता अधोरेखित केली.

नॅशनल कॉन्फरन्सच्या संभाव्य आघाडीची शक्यता रैना यांनी फेटाळली नाही. रैना म्हणाले की, फारूक अब्दुल्ला यांनी ‘भारतमाता की जय’ असा नारा काश्मीरमध्ये देऊन राष्ट्रवादाचे दर्शन घडवले आहे. अब्दुल्ला यांच्या पाठीशी उभे राहू! फारूक अब्दुल्ला यांच्याशी काही मुद्दय़ांवर वैचारिक मतभेद आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप कधी सरकार बनवेल याबाबत रैना यांनी बोलण्यास नकार दिला. पीडीपीच्या काळात मोदी सरकारने ८० हजार कोटी रुपये विकासासाठी दिले होते; पण विकासाची कोणतीही कामे झाली नाहीत. आता राज्यपाल राजवट असून विकासाच्या कामांना गती आली आहे. कामे मार्गी लागली की पुन्हा सरकार बनवण्याचा भाजप प्रयत्न करेल, असे रैना यांनी सांगितले.

पीडीपीचे काही आमदार फोडून भाजप सरकार बनवेल, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होत आहे. मात्र फारुक अब्दुल्ला यांनी वाजपेयींच्या प्रार्थना सभेत आघाडीचे संकेत दिल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्याच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. रैना यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय स्तरावर अजून निर्णयप्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र ८-९ सप्टेंबर रोजी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय बैठक होत असून या वेळी या विषयावर विचार होऊ  शकतो.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेत मुख्यमंत्रिपद हा वादाचा मुद्दा होण्याची शक्यता आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असे देशाला वाटते, पण भाजपकडे संख्याबळ नाही, असे सांगत रैना यांनी या वादावर बोलण्याचे टाळले.