गांधी कुटुंबीयांना उपस्थितीतून सूट
नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने राष्ट्रीय नवप्रवर्तन मंडळाचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना जामीन मंजूर केला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच इतरांना खटल्याच्या कामकाजात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार व्यक्तिगत उपस्थितीतून सूट दिली आहे. आता पुढील सुनावणी २१ मार्चला होणार आहे.
महानगर दंडाधिकारी लव्हलिन यांनी पित्रोदा यांना ५० हजार रुपयांचे व्यक्तिगत बंधपत्र व तितक्याच रकमेची हमी या आधारे जामीन दिला. सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नाडिस या सर्वानाच व्यक्तिगत उपस्थितीतून सूट देण्यात आली असून त्यांना याआधीच जामीन मिळाला आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांचे वकील कपील सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात जी कागदपत्रे मागवली आहेत त्यांचा नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंध आहे की नाही याची खातरजमा करावी. कारण मोतीलाल व्होरा यांनी कागदपत्रे मागवण्याच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत न्यायालयाने ही कागदपत्रे सीलबंद ठेवावीत. स्वामी यांनी सांगितले की, ही कागदपत्रे असोसिएटेड जर्नल लिमिटेडशी संबंधित आहेत व ती या प्रकरणाशी संबंधितच आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १२ फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात असे म्हटले होते की, कनिष्ठ न्यायालयाने गरज असेल तरच सोनिया, राहुल आदींची व्यक्तिगत उपस्थिती मागावी अन्यथा तसे करू नये त्यामुळे न्यायालयाने या सर्वाना व्यक्तिगत उपस्थितीतून सूट दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गांधी व इतरांवर नॅशनल हेराल्ड प्रकरणी खटला भरला आहे. यंग इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीने नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात होते. त्याची मालमत्ता गांधी कुटुंबीयांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या माध्यमातून हडप केली होती. त्याबाबत स्वामी यांनी दाखल केलेल्या खटल्यावर गेल्या २६ जूनला काँग्रेस नेत्यांवर न्यायालयाने समन्स जारी केले होते.

 

काँग्रेसचा मोर्चा
पाटणा: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याच्या निषेधार्थ बिहार काँग्रेस सोमवारी आक्रोश मोर्चा काढणार आहे.
राज्यात युद्धसदृश स्थिती निर्माण करण्यासाठी संघ परिवार आणि भाजपच्या नेत्यांकडून अशी विधाने केली जात आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने राज्यभर सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.