09 March 2021

News Flash

‘आकाश’ची पुन्हा चाचणी

भारताने लागोपाठ दुसऱ्या दिवशी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हवाई दलाने घेतलेली ही उपयोजित चाचणी आहे. ही चाचणी यशस्वी झाली असे

| November 19, 2014 01:05 am

‘आकाश’ची पुन्हा चाचणी
बालासोर, ओडिशा : भारताने लागोपाठ दुसऱ्या दिवशी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हवाई दलाने घेतलेली ही उपयोजित चाचणी आहे. ही चाचणी यशस्वी झाली असे प्रक्षेपण केंद्राचे संचालक एम. व्ही. के.व्ही. प्रसाद यांनी सांगितले. मध्यम पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राच्या या आठवडय़ात आणखी चाचण्या घेण्यात येणार आहेत. चंडीपूर येथील चाचणी संकुल तीन येथून हे क्षेपणास्त्र दुपारी ३.२२ वाजता सोडण्यात आले. साठ किलोचे अण्वस्त्र वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून २५-३० किलोमीटर लांब असलेले विमान पाडण्याची त्याची क्षमता आहे.

जपानमध्ये मध्यावधी निवडणुका शक्य?
टोकियो : जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी मध्यावधी निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. जपानमध्ये मंदी आल्यानंतर तेथे आर्थिक सुधारणांवर मतदारांचा कौल यात अजमावला जाईल. दोनच वर्षांपूर्वी अॅबे हे सत्तेवर आले होते. देशाची आर्थिक वाढ खूपच कमी झाली असल्यामुळे जपानवर आर्थिक संकट कोसळले आहे. आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी अॅबे यांनी केलेल्या प्रयत्नांचा फारसा परिणाम झाला नाही. अलीकडे त्यांनी विक्रीकर वाढवला होता.

वर्धमान स्फोट प्रकरणी एकास अटक
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात म्यानमारच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याला पाकिस्तानी संघटना तेहरिक ए तालिबानने प्रशिक्षण दिले होते. हैदराबाद येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. खालीद उर्फ खालीद महंमद असे त्याचे नाव असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे हैदराबादेत राहत होता. त्याला १६ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात दिले.

महाराष्ट्राचे ६ जण जखमी
पाटणा : बिहारमध्ये कैमूर जिल्ह्य़ात महाराष्ट्राचे सहा पर्यटक बस थांबलेल्या ट्रकवर आदळल्याने जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग २ वर ही घटना घडली. पहाटे रेहुआ गावानजीक हा अपघात झाला. बसची नोंदणी महाराष्ट्रातील आहे. दुर्गावती पोलिस ठाण्याचे अधिकारी श्रीराम सिंग यांनी सांगितले की, प्रवाशांना उपचारासाठी वाराणसीला हलवले आहे तर काहींना उपविभागीय रूग्णालयात हलवले आहे. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती ट्रकवर आदळली.

काश्मीरात थंडी सुरू
श्रीनगर : काश्मीरमध्ये यंदा प्रथमच थंडी सुरू झाली असून तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. लडाखमधील लेह येथे उणे दहा अंश तापमान नोंदले गेले, तर पहलगाम पर्वतीय भागात उणे ८.६ तपमान होते. श्रीनगरला उणे ०.३ तापमानाची नोंद झाली, तर कारगिलमध्ये उणे ७.२ अंश सेल्सियस तापमान होते. काझीगुंड येथे उणे १.४ अंश तापमान नोंदले गेले. गुलमर्ग या उंचावरील ठिकाणी उणे ०.२ अंश सेल्सियस तापमान होते.

स्वच्छतागृह महोत्सव सुरू
नवी दिल्ली : संपूर्ण स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी व उघडय़ावर शौचास बसण्याची पद्धत बंद करण्यासाठी तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय प्रसाधनगृह महोत्सव जागतिक प्रसाधनगृह दिनाच्या निमित्ताने सुरू झाला. येथील सेंट्रल पार्क मध्ये सुलभ इंटरनॅशनलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व भूतान या देशांचे प्रतिनिधी, वृंदावनच्या १०० विधवा, दिल्लीतील नऊ शाळांचे ९०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उद्दिष्ट २०१९ मध्ये साध्य होईल, असे सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2014 1:05 am

Web Title: national news from india
Next Stories
1 वढेरा यांचा जमीन करार मंजूर करणारा अधिकारी निलंबित
2 भाजप प्रवेशाच्या वृत्ताचे मांझींकडून खंडन
3 काश्मीरच्या निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार
Just Now!
X