नॅशनल ऑर्किड गार्डन ऑफ सिंगापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली त्या वेळी येथील एका ऑर्किडला त्यांचे नाव देण्यात आले. डेन्ड्रोबियम नरेंद्र मोदी असे आर्किडचे नामकरण करण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. हे ऑर्किड मोठे व उष्णकटिबंधीय भागातील असून त्यात ३८ से.मी. लांब फुलांचा समुच्चय असतो. त्यात १४ ते २० फुले सुंदर रचनेत साकारलेली असतात. त्यात काही पाकळय़ा वेगळय़ा पद्धतीने वळलेल्या असतात. यात वेगवेगळी रंगसंगती असते. पंतप्रधान मोदी यांनी नंतर सिंगापूरमधील श्री मरियाम्मन हिंदू मंदिरास भेट देऊन प्रार्थना केली. हे मंदिर १८२७ मध्ये नागपट्टणम व कडलोर येथून आलेल्या स्थलांतरितांसाठी बांधलेले असून ते मरियाम्मन देवतेचे आहे. संसर्गजन्य व इतर रोग बरी करणारी ही देवता मानली जाते. यातून सिंगापूर बरोबरचे सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होत आहेत असे सांगण्यात आले. चायनाटाऊन भागात मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे.

अमेरिकी संरक्षणमंत्र्यांशी मोदींची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांची सिंगापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. पेंटॅगॉनने अलीकडेच पॅसिफिक कमांडचे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड असे केले आहे, त्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा प्रश्नावंर चर्चा झाल्याचे समजते. मोदी हे तीन देशांच्या दौऱ्यातील अखेरच्या टप्प्यात सिंगापूर येथे आले असताना त्यांची मॅटिस यांच्या समवेत गोपनीय बैठक झाली. दोन्ही देशांच्या हितावर चर्चा झाली असून त्या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल उपस्थित होते. ही बैठक तासभर चालली. शांग्रिला संवादाच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक झाली असून त्यात आशियाचे सध्याच्या परिस्थितीत असलेले महत्त्व मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी शांग्रिला संवाद कार्यक्रमात असे सांगितले, की भारत व चीन यांनी एकत्र काम करण्यातच जग व आशियाचेही भले आहे, पण तसे करताना एकमेकांच्या हिताच्या मुद्दय़ांवर संवेदनशीलता दाखवली पाहिजे. सागरी व हवाई मार्गाची आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समान उपलब्धता असली पाहिजे. त्यासाठी सागरी संचार स्वातंत्र्य, अडथळे मुक्त व्यापार, वादांवर शांततामय तोडगा यांची आवश्यकता आहे.

शांग्रिला संवादात मॅटिस यांनी सांगितले, की नियमांवर आधारित व्यवस्थेला महत्त्व असले पाहिजे.

मॅटिस यांनी मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत असे सांगितले, की दोन्ही देश इतर देशांच्या मदतीने इंडो पॅसिफिक भागात शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सागरी मार्ग सर्व देशांना खुले असावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. चीनबरोबर दक्षिण चीन सागरातील तणावाच्या वातावरणामुळे पेंटॅगॉनने पॅसिफिक कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे केले आहे.

चांगी नौदल तळास मोदी यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगी नौदल तळाला भेट देऊन भारतीय व रॉयल सिंगापूर नौदलाचे खलाशी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांच्या समवेत सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री महंमद मलिकी ओस्मान होते. भारत व सिंगापूर यांच्यात सागरी क्षेत्रातही सहकार्य आहे, ते चांगी नौदल तळाला भेट दिली असता दिसून आले. गेली पंचवीस वर्षे नौदल दोन्ही देशांत अखंडपणे नौदल कवायती सुरू आहेत, पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस फॉर्मिडेबल या सागरी युद्धनौकेला भेट दिली असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. मोदी यांनी भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा या नौकेतील खलाशी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा संवाद साधता आला याचा आनंद वाटतो असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आयएनएस सातपुडा सध्या चांगी नौदल तळावर तैनात आहे. भारत व सिंगापूर यांच्या नौदलांमध्ये सहकार्याचा करार झाला असून त्यात पाणबुडय़ा, नौदल विमाने, जहाजे या बाबतच्या सेवा एकमेकांना पुरवण्याचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक भागात आपली लष्करी दले ही मोठी भागीदारी उभी करत असून त्यातून मानवी मदत, आपत्कालीन मदत, शांतता व सुरक्षितता ही उद्दिष्टे साध्य होत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.