राष्ट्रीय पोलिओ प्रतिबंधक लस मोहीम काही कारणास्तव केंद्र सरकारने पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली आहे.

राष्ट्रीय प्रतिरक्षा दिन हा पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत १७ जानेवारीला देशभरात पाळला जातो, त्या दिवशी पोलिओची लस दिली जाते. पुढील आदेशापर्यंत त्याची अंमलबजावणी स्थगित राहील, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना ९ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन यांनी ८ जानेवारीला केलेल्या वक्तव्यात सांगितले होते, की १७ जानेवारीला ठरल्याप्रमाणे पोलिओ लसीकरण केले जाईल. दरम्यान आता १६ जानेवारीपासून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जगातील हा सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे. बहुधा त्यामुळेच पोलिओ लसीकरण तूर्त लांबणीवर टाकण्यात आले असावे असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात आघाडीवर काम करणाऱ्या तीन कोटी आरोग्य व इतर कर्मचाऱ्यांना करोनाची लस दिली जाणार आहे.

कोविड १९ लसीकरणाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे राज्यांना जारी करण्यात आली असून त्यात आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचारी, नंतर पन्नास वर्षे वयावरील व्यक्ती यांना लस देण्यात येईल, असे म्हटले आहे. करोनाची स्थिती पाहून त्यात सहआजार असलेल्या व्यक्तींनाही नंतर लस देण्यात येणार आहे.