१९९८ साली रस्ते अपघात प्रकरणात पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धु यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने रस्ते अपघात प्रकरणी सिद्धु यांना सदोष मनुष्य़वधाच्या आरोपाखाली दोषी धरत, ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टीस चेलमेश्वर आणि संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने सिद्धु यांना दिलासा देत केवळ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

२७ डिसेंबर १९८८ रोजी सिद्धु आणि त्यांचे साथीदार रुपिंदरसिंह संधू हे जिप्सी गाडीतून प्रवास करत होते. यादरम्यान शेरनवाला गेट परिसरात गुरनाम सिंह यांच्याशी सिद्धु यांचा वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या गाडीला पुढे जाण्यासाठी जागा न दिल्यामुळे रागावलेल्या सिद्धुने गुरनाम सिंह यांना मारहाण करुन घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. यानंतर जखमी झालेल्या गुरनाम सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

१९९९ साली सत्र न्यायालयाने सिद्ध यांची रस्ते अपघात प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. २००६ साली उच्च न्यायालयाने सिद्धु आणि त्यांचे साथीदार रुपिंदरसिंह संधू यांना दोषी मानत ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयला सिद्धु यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना दिलासा दिला आहे.