पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना आज अबु धाबी विमानतळावर अटक केली जाणार आहे. दोघेही अबु धाबीला पोहोचले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर जवळपास सात तास त्यांना थांबावं लागणार आहेत. तेथून त्यांना संध्याकाळी ६.१५ वाजता लाहोरला नेलं जाणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना इस्लामाबादलाही नेलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. दोघेही लंडनमध्ये होते आणि तेथून निघण्याआधी शरिफ यांनी मुलीसोबत रुग्णालयात जाऊन पत्नीची भेट घेतली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरला रवाना होण्याआधी नवाज शरिफ विमातळाबाहेर भव्य रॅली काढणार आहेत. विमातळाबाहेर रॅलीची तयारीदेखील करण्यात आली आहे.

अॅव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरिफ यांना १० वर्षे तर त्यांची कन्या मरियम यांना ७ वर्षांची आणि जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवाज यांना सुमारे ७३ कोटी रुपये आणि मरियम यांना सुमारे १८.२ कोटी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. याच प्रकरणी आत्मसमर्पण करण्यासाठी नवाज शरिफ मुलीसोबत लाहोरला जात आहेत.

नवाज शरिफ आणि मरियम एकदा पाकिस्तानात पोहोचल्यानंतर पुन्हा बाहेर जाऊ शकणार नाहीत. त्यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. नवाज शरिफ आणि मरियम यांना एका दिवसासाठी आदियाला कारागृहात ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांना अटॉक फोर्ट जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे.

नवाज शरिफ यांनी मायदेशी परतण्याआधी आपल्याला कारागृह दिसत आहे, मात्र तरीही आपण परतत आहोत. कारण आपण जनादेशाचा आदर करतो असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी परवेज मुशर्ऱफ यांच्यावर निशाणा साधला. आपण मुशर्रफ यांच्याप्रमाणे भित्रे नाही आहोत. कारागृहात जाण्याच्या भीतीने पळून जाणार नाही असंदेखील म्हटलं. मला तर १० वर्षांची शिक्षा झाली आहे, तरीही मी मायदेशी परतत आहे. पण मुशर्ऱफ यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, तरी भित्र्यासारखे पळत आहेत अशी टीका त्यांनी केली.