पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा शहाजोगपणा

नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने लक्ष्यभेदी कारवाई केलेली नसल्याचा पाकिस्तानचा दावा कायम असला तरी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्राला मार्गदर्शन करताना भारताला लक्ष्य केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा उल्लेख करत नवाज शरीफ यांनी रणगाडय़ांनी दारिद्रय़निर्मूलन होणार नाही, असे कावेबाज वक्तव्य केले.

पाकिस्तानने आधी दारिद्रय़निर्मूलन आणि साक्षरता या आघाडय़ांवर भारताशी स्पर्धा करावी, असा टोला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला लगावला होता. शरीफ यांनी या विधानाचा उल्लेख करत भारताला लक्ष्य केले.

बुरहान वानीचे गोडवे

शरीफ यांनी पुन्हा बुरहान वानीचे गोडवे गायिले. काश्मिरी जनतेच्या हक्कांचे बुरहान वानीने स्मरण करून दिले आहे, असे शरीफ म्हणाले. भारताकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात काश्मिरी तरुण पुढे सरसावले असून, त्यांनी स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला आहे, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

‘आपण एकटे का पडलो’

पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी मात्र शरीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाच देशांनी सार्क परिषदेत उपस्थिती दर्शविण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांनी शरीफ यांच्यावर निशाणा साधला. या पाचपैकी अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुस्लीम देशांचाही समावेश आहे. आपण एकटे का पडलो आहोत, असा सवाल पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते खुर्शीद शाह यांनी केला. आपले परराष्ट्र धोरण चुकत आहे. आपल्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळेच बांगलादेशही आपल्याविरोधात गेला आहे, असे शाह म्हणाले.

युद्ध नको- बिलावल भुट्टो

पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी भारत आणि पाकिस्तान यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. सीरियातील युद्धात भरडल्या गेलेल्या नागरिकांच्या फुटेजकडे लक्ष वेधत युद्ध असे दिसते, असे बिलावलने म्हटले आहे.