पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांची नॅशनल असेंब्लीमध्ये औपचारिकपणे निवड करण्यात आली. त्यामुळे शरीफ यांचा पाकिस्तानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.पार्लमेण्टमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत शरीफ यांना ३४२ पैकी २४४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पाकिस्तान पीपल्स पार्टीचे मखदूम फहीम यांना केवळ ४२ मते मिळाली. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते जावेद हाश्मी यांन ३१ मते मिळाली.
जवळपास १३ वर्षांनंतर शरीफ यांनी पार्लमेण्टमध्ये पुन्हा प्रवेश केला. माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या उठावानंतर १९९९ मध्ये शरीफ सरकार पायउतार झाले होते.
देशापुढील आव्हानांचा सर्व पक्षांनी सामूहिक मुकाबला करण्याची गरज – नवाझ शरीफ
पाकिस्तानला मोठी राजकीय आणि आर्थिक आव्हाने भेडसावत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व पक्षांनी सामूहिकपणे काम करण्याची गरज असल्याचे मत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले. शरीफ यांची पंतप्रधानपदी औपचारिकपणे निवड झाल्यानंतर त्यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण केले. पाकिस्तानला गंभीर समस्यांनी ग्रासले असून त्या समस्या कोणत्याही एका राजकीय पक्षाला सोडविता येणार नाहीत. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधी पक्ष आणि अन्य संबंधितांनी या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे शरीफ म्हणाले. सर्व पक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी आपण संपर्क साधणार आहोत.  किमान समान कार्यक्रम ठरवून देशाला समस्यांच्या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू असे आवाहन शरीफ यांनी केले.