पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांच्या कन्या मरयम यांनी रावळपिंडीतील अतिसुरक्षा असलेल्या आदियाला तुरूंगात पहिली रात्र काढली. त्यांना  ‘ब’ दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या होत्या असे सांगण्यात आले.

राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शरीफ (वय६८) व मरयम (वय ४४) यांना अ‍ॅव्हेनफील्ड प्रकरणात ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तुरूंगात केली. लंडनहून अबूधाबी मार्गे काल ते लाहोर विमानतळावर येताच त्यांना ताब्यात घेऊन इस्लामाबादला खास विमानाने नेण्यात आले. तेथून चिलखती गाडय़ातून रावळपिंडीतील अदियाला तुरूं  गात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांना ब दर्जाच्या सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. इस्लामाबाद प्रशासनाने काढलेल्या सूचनेनुसार सिंहला पोलिस ट्रेनिंग कॉलेजच्या विश्रामगृहात शरीफ व त्यांच्या कन्येला ठेवण्यात येणार होते. त्या विश्रामगृहालाच तुरूंगाचा दर्जा देण्यात येणार आहे.  पण जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी त्यांना तूर्त आदियाला तुरूंगातच ठेवले आहे. शरीफ व त्यांच्या कन्येची इस्लामाबादचे दंडाधिकारी व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या समक्ष वैद्यकीय तपासणी करून ते दोघेही तंदुरूस्त असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, कायदा व न्याय मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून उत्तरदायित्व न्यायालय भ्रष्टाचाराच्या इतर दोन प्रकरणांची सुनावणी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात फ्लॅगशिप इनव्हेस्टमेंट व अल अझिजीया स्टील मिल्स यांचा समावेश आहे. आदियाला तुरूंगातच ही सुनावणी होणार आहे.

उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश महंमद बशीर यांनी काल रात्री शरीफ व त्यांच्या कन्येविरोधात वॉरंट जारी करून त्यांची सुनावणी तुरूंगात घेण्याचे जाहीर केले. शरीफ व त्यांची कन्या मरयम यांना उत्तरदायित्व न्यायालयाने  अनुक्रम १० व ७ वर्षे  तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे. शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्स प्रकरणी गेल्या वर्षी अपात्र ठरवले होते.

सुशिक्षित कैद्यांना ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा

‘अ’ व ‘ब’ दर्जाचे कैदी हे सुशिक्षित असल्याने ते ‘क’ वर्गातील अशिक्षित कैद्यांना शिकवण्याचे काम करतात. शरीफ व त्यांच्या कन्येला ‘ब’ दर्जा देण्यात आला असून त्यात एक कॉट, एक खुर्ची, एक चहा भांडे, एक कंदील किंवा लाइट, मांडणी (शेल्फ), कपडे धुण्याची सुविधा व इतर साधने दिली जातात. यात टीव्ही, वातानुकूलक व वृत्तपत्रे या सुविधाही कैद्यांना त्यांच्या खर्चाने घेता येतात.