पनामा पेपर्सप्रकरणी; संयुक्त तपास पथकासमोर शरीफ यांचे स्पष्टीकरण

आपण अथवा आपल्या कुटुंबीयांनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडून आलेले असून काही अज्ञात घटक आपल्या सरकारविरुद्ध कारस्थान रचत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला.

शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराबाबतचा उल्लेख पनामा पेपर्समध्ये उघड झाला असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर गुरुवारी शरीफ हजर झाले होते. संयुक्त तपास पथकासमोर आपली भूमिका स्पष्ट केल्याचे शरीफ यांनी सांगितले.

पनामा पेपर्समध्ये करण्यात आलेल्या आरोपांचा आपल्या पंतप्रधानपदाशी संबंध नाही, पंतप्रधान म्हणून आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले नाहीत. आपण आणि आपल्या कुटुंबीयांविरोधात आरोप करण्यात आलेले असून ते कुटुंबीयांच्या उद्योगाशी संबंधित वैयक्तिक आरोप आहेत, असे शरीफ म्हणाले. अशा प्रकारच्या तपास पथकासमोर हजर राहणारे शरीफ हे पाकिस्तानचे पहिलेच विद्यमान पंतप्रधान आहेत. सहा सदस्यांच्या पथकाने शरीफ यांची जवळपास तीन तास चौकशी केली.

आपण तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवित आहोत, आपण कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत, मात्र विरोधकांनी आपल्यावर गैरकृत्य केल्याचा आरोप केलेला नाही. आपल्यावर आणि कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करण्यात आले, मात्र आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. विरोधकांनी आपल्यावर आणि कुटुबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र यापूर्वी अथवा सध्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, असेही ते म्हणाले.

आपण अथवा आपल्या कुटुंबीयानी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, सध्या सुरू असलेल्या या चौकशीतूनही आपण सहीसलामत बाहेर येऊ, असा विश्वास शरीफ यांनी व्यक्त केला. आपल्याविरोधात आणि लोकशाहीविरोधात काही अज्ञात घटक कारस्थान रचत असून त्याचा देशाला धोका आहे, असेही ते म्हणाले. विरोधकांची सर्व कारस्थाने फोल ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

संयुक्त तपास पथकाचे प्रमुख वाजिद झिया यांनी शरीफ यांना या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तऐवज घेऊन १५ जून रोजी पथकासमोर हजर राहण्यास सांगितले होते. कझाकस्तानमधून गेल्या आठवडय़ात परतल्यानंतर त्यांच्यावर समन्स बजावण्यात आले होते.