आपल्याला राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. पक्षाचे नेतृत्व करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी वरील आरोप केला आहे.

पनामा पेपर्सप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर शरीफ वार्ताहरांशी बोलत होते. पक्षाचे नेतृत्व करण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय आपल्याला अनपेक्षित नव्हता, प्रथम त्यांनी सरकार खिळखिळे केले आणि त्यानंतर बुधवारी त्यांनी संसदेचे अधिकार काढून घेतले, असे ते म्हणाले.

तथापि, हे कृत्य कोणी केले ते शरीफ यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांचा रोख सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे होता. पक्षाचे नेतृत्व करण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला तो पंतप्रधान म्हणून पदच्युत करण्यात आल्यानंतरचे पुढील पाऊल आहे. आपल्याला राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

जुलै महिन्यात आपले पंतप्रधानपद काढून घेण्यात आले, त्यानंतर बुधवारी पीएमएल-एन पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले, आपले नाव मोहम्मद नवाझ शरीफ आहे ते नावही आपल्यापासून हिसकावून घ्यायचे असल्यास तेही काढून टाकण्यास आपली हरकत नाही, असेही शरीफ म्हणाले.

शरीफ यांना पक्षाचे नेतृत्व करता यावे यासाठी निवडणूक कायदा २०१७ हा व्यक्तिकेंद्रित होता असे मत न्यायालयाने व्यक्त केले त्यावरही शरीफ यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे शरीफकेंद्रित असल्याचे ते म्हणाले. सूडबुद्धीने निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.