पाकिस्तानला भेडसावणाऱ्या ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी चीनकडून नागरी अणुतंत्रज्ञान मिळावे, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नवाझ शरीफ यांनी गुरुवारी चीनचे पंतप्रधान लि केकियांग यांच्याकडे केली. येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी सकाळी नवाझ शरीफ आणि पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या लि केकियांग यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही नेत्यांनी संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला.
या बैठकीत नवाझ शरीफ यांनी नागरी आण्विक तंत्रज्ञान, व्यापार आणि परदेशी गुंतवणूक आदी मुख्य मुद्दय़ांवर लि केकियांग यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. देशासमोर असलेल्या ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी चीनकडून भरीव मदतीची अपेक्षा असल्याचेही शरीफ यांनी म्हटले. दरम्यान, लि केकियांग यांनी नवाझ शरीफ यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच पाकिस्तानातील नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या.
लि यांच्या दौऱ्यामुळे मोबाइल सेवा बंद
चीनचे पंतप्रधान लि केकियांग यांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या आजूबाजूच्या भागातील मोबाइल सेवा दोन दिवस बंद ठेवली.
मोबाइल सेवा बंद ठेवल्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली.
पंतप्रधान लि केकियांग यांच्या सुरक्षेत कोणतीही उणीव राहू नये यासाठी  बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत तर गुरुवारी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत इस्लामाबाद आणि रावळपिंडी भागातील मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली होती. मोबाइल सेवा बंद ठेवल्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली.
बॉम्बस्फोटात १० सैनिकांचा मृत्यू
क्वेट्टा शहरात सैनिकांना घेऊन जाणारे वाहन दहशतवाद्यांनी बॉम्बच्या साहाय्याने उडवून दिल्यामुळे १० सैनिकांसह १२ जण मृत्युमुखी पडले तर २० पेक्षा अधिक जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. दहशतवाद्यांनी एका ऑटोरिक्षामध्ये तब्बल १०० कि. ग्रॅ. वजनाचे स्फोटक ठेवून स्फोट घडवून आणल्याची माहिती उपपोलीस महासंचालक फय्याद अहमद सुंबल यांनी दिली.