क रो ना चा कहर

कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर भारतात करोना रुग्णांची आताची संख्या पाहता मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत १० ते १३ लाख रुग्ण असू शकतील, असे मत आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केल्याने ही वेळ येण्याची शक्यता कमी झाली आहे.

करोना विषाणू इंडिया १९ अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवालानुसार भारताने या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले असून इतर देशांपेक्षा निश्चित रुग्णांची संख्या खूप कमी आहे. अमेरिका व इटलीचा विचार करता पहिल्या टप्प्यातील ही संख्या फार नगण्य आहे. पण यात भारताने खरोखर संसर्ग असलेल्या रुग्णांच्या संख्येकडे दुर्लक्ष केले आहे. यात पहिला मुद्दा असा की, चाचण्यांची व्यापकता कमी आहे शिवाय चाचण्यांचे निष्कर्ष अचूक नाहीत. जे लोक संसर्गित आहेत पण लक्षणे दाखवत नाहीत अशांच्याही चाचण्या करणे गरजेचे आहे. त्या भारताने केलेल्या नाहीत.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या देबश्री राय यांच्यासह काही वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, भारतात चाचणी करण्यात आलेल्या लोकांची संख्या खूप कमी आहे. व्यापक चाचण्या होत नसल्याने सामाजिक संक्रमण नेमके किती आहे हे स्पष्ट झालेले नाही. रुग्णालयाबाहेर व आरोग्य सुविधांच्या ठिकाणी किती जणांना संसर्ग झाला आहे हे समजलेले नाही.  त्यामुळे आधीच्या टप्प्यातील आकडेवारी पाहता भारताने खूप कडक उपाययोजना केल्या तरच संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या कमी करणे शक्य आहे. पंतप्रधान मोदी यानी मंगळवारी २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली असून त्याचे पालन जर व्यवस्थित झाले नाही तर देश २१ वर्षे मागे जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. वैज्ञानिकांनी १६ मार्चपर्यंतच्या रुग्ण संख्येचा आधार घेऊन विविध प्रतिमानांच्या मदतीने  हे संशोधन केले आहे.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मिशीगन विद्यापीठ यांच्या वैज्ञानिकांनी एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, रुग्ण संख्येचा हा अंदाज कडक निर्बंधांनंतर बदलू शकतो. भारतातील आरोग्य सुविधांवर फार मोठा ताण असून  सध्या रुग्णांची संख्या कमी असतानाही रुग्णालयांना सेवा देणे काहीसे कठीण जात आहे.

..तर आरोग्यसेवा पुरविणे कठीण

जागतिक बँकेने म्हटल्यानुसार भारतात दर १००० लोकांमागे ०.७ खाटा रुग्णालयात उपलब्ध असून फ्रान्समध्ये ही संख्या ६.५, दक्षिण कोरियात ११.५, चीनमध्ये ४.२, इटलीत ३.४, अमेरिकेत २.८ आहेत. रुग्णांची संख्या वाढली तर भारतातील आरोग्यसेवा पुरवठादारांना सेवा देणे कठीण होणार आहे. भारतात आरोग्य विमा नसलेल्या लोकांची संख्या २०१४ मध्ये ११०० दशलक्ष होती त्यातील ३०० दशलक्ष लोकांना रक्तदाब व इतर विकार आहेत. त्यामुळे धोरणात्मक हस्तक्षेपाशिवाय रुग्णांची संख्या कमी करता येणार नाही. जर गंभीर रुग्णांचे प्रमाण ५ ते १० टक्के असेल तर भारतीय रुग्णालयातील खाटांच्या क्षमतेपेक्षा ५ ते १० टक्के अधिक खाटा लागतील. भारतात सध्या करोना रुग्णांची संख्या ५६२ असून मृतांची संख्या दहा आहे.