लोकसभा सभापतींच्या पुढय़ातील ध्वनिक्षेपकाची मोडतोड, सभागृहात मिरपूड फवारण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आणि अन्य खासदारांना चाकू दाखविणे यांसारख्या संसदीय परंपरेस काळिमा फासणाऱ्या घटनांनंतर, आता खासदारांसाठीही ‘छाननी प्रक्रिया’ हवीच, अशी आग्रही मागणी पुढे आली आहे. संसदेच्या प्रवेशद्वारावरच, सर्वच खासदारांसाठी ही पद्धती अमलात आणली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी एकमुखाने केली आहे. काहींनी तर खासदारांचे हे वर्तन म्हणजे ‘दहशतवादी कृत्य’ असल्याची टीकाही केली.
‘गुरुवारी खासदारांनी ज्या वस्तूंसह सभागृहात प्रवेश केला होता, ते लक्षात घेता अशा वस्तू संसदेच्या प्रवेशद्वारावरच अडविल्या जातील याची योग्य ती काळजी घ्यायला हवीच. खासदारांना अशा वस्तू सभागृहात नेण्यापासून रोखणारी यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार सुखिंदर रेड्डी यांनी व्यक्त केली.
झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार कामेस्वर बैथा यांनीदेखील ‘संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांची तपासणी आवश्यक असल्याची’ मागणी केली. गुरुवारी झालेल्या प्रकारामुळे, लोकशाहीच्या या मंदिरास बट्टा लागल्याची आपली भावना झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते भक्त चरण दास यांनी तर खासदारांचे लोकसभेतील गुरुवारचे वर्तन म्हणजे, दहशतवादी कृत्यच आहे, असा आरोप केला.