स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि इतरांवर टीका करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून स्वत:ची माध्यमसंस्था सुरू करण्याच्या वाढत्या प्रकारावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी टीका करून पत्रकारितेचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.

व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अलीकडेच दिल्ली येथे आठ उत्कृष्ट संसदपटूंना पुरस्कार देण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. ‘लोकमत’ समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. बातम्या आणि त्याबाबतची मते यांची कधीही सांगड घातली जाऊ नये, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर केवळ बातमीच असावी आणि त्याबाबतची मते संपादकीय पानावर असावी, असे नायडू म्हणाले. ‘पेड न्यूज’ आणि ‘फेक न्यूज’ हे दुर्दैवाने भारतातील कटू वास्तव ठरत आहेत. पुष्टी मिळाल्याविना माहिती देणे धोकादायक आहे, असे मतही या वेळी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांची सुरुवात करणे ही चांगली कल्पना आहे, त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवताना माझ्यासारख्याचे काम अधिक सुलभ होणार आहे, कारण अशा पुरस्कारामुळे खासदारांना चांगले कामकाज करण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगून सभागृहात अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत कधीही न आल्याबद्दल नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली. खासदारांनी खासगी विधेयक मांडले पाहिजे, कारण त्यामुळे एखाद्या विषयावर जनमताला चालना मिळते, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.

सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, भाजपच्या खासदार भारती प्रवीण पवार, द्रमुकचे खासदार तिरुची सिवा, काँग्रेस खासदार विप्लव ठाकूर आणि जद(यू)च्या खासदार कहकशाँ परवीन आदींना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने त्यांची निवड केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उत्कृष्ट महिला खासदार पुरस्कार स्वीकारताना सुप्रिया सुळे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद पवार तसेच ‘लोकमत’चे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा या वेळी उपस्थित होते.