रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील. त्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेतील आणि भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

करोनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असून, १७५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील. निमंत्रणपत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल. गर्दी टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

भूमिपूजन सोहळा साजरा होत असताना करोनाचे नियम पाळण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे निमंत्रितांशिवाय अन्य कोणालाही अयोध्या शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले. बाजारपेठ आणि दुकाने सुरू राहणार असली तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

भूमिपूजन सोहळ्याबद्दल संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरस्थित मुख्यालयात दिवे लावण्यात येणार आहेत. संघाने विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची आम्हाला उत्सुकता आहे. हा दुर्मीळ आणि ऐतिहासिक क्षण आहे. मात्र, तबलिगी जमातप्रमाणे या सोहळ्याद्वारे करोना संसर्ग फैलाव होऊ नये, याची काळजी घेण्यात येत असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

मंदिराचे प्रारूप

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस माझ्यासह सर्व भारतीयांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक आहे. हे मंदिर सौहार्दपूर्ण आणि समृद्ध भारताचे प्रतीक ठरेल, असा विश्वास आहे.

– लालकृष्ण अडवाणी, ज्येष्ठ नेते, भाजप