व्यूहात्मक बदलांबाबत संरक्षणप्रमुखांचे सूतोवाच

भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हाने लक्षात घेऊन देशाच्या पश्चिम व उत्तर सीमांवर दोन ते पाच संयुक्त लष्करी कमांड स्थापन केले जातील आणि अशा प्रकारची पहिली रचना २०२२ पर्यंत कार्यरत केली जाईल, असे सांगून संरक्षणप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी भारताची सामरिक व्यूहात्मक बदलांची संरचना उघड केली.

सध्याच्या संरचनेत आमूलाग्र बदल करून, जम्मू- काश्मीरमधील सुरक्षाविषयक आव्हाने हाताळण्यासाठी तेथे एक स्वतंत्र संयुक्त लष्करी कमांड स्थापन केले जाईल, अशीही माहिती जनरल रावत यांनी दिली. जुन्या झालेल्या लष्करी सामुग्रीच्या समस्येवर उपाय म्हणून ११४ लढाऊ जेट विमानांसारखी मोठी खरेदी करण्याबाबत नवे धोरण स्वीकारण्यात येत असल्याचेही जनरल रावत यांनी पत्रकारांना सांगितले.

भारतीय नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम कमांडचे विलीनीकरण करून प्रस्तावित द्वीपकल्प कमांड (पेनिन्सुला कमांड) २०२१ सालच्या अखेपर्यंत साकार होण्याची शक्यता असल्याचेही संरक्षणप्रमुख म्हणाले. नौदल कमांडरच्या नेतृत्वाखालील तिन्ही सेवांच्या (ट्राय-सव्‍‌र्हिस) कमांडमध्ये हवाई साधने तसेच त्यांना लष्कराचे पाठबळ राहील आणि हे कमांड हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षाविषयक आव्हानांची संपूर्ण काळजी घेईल. हिंदी महासागराची सुरक्षा एका कमांडरच्या हाती राहील आणि जहाजांच्या हालचालींसह परिचालनविषयक बाबींसाठी त्याला दिल्लीची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही, असेही जनरल रावत यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित हवाई संरक्षण (एअर डिफेन्स) कमांड हे पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यरत होण्याची शक्यता असून, भारतीय लष्कर व नौदलाची क्षेपणास्त्रांसारखी हवाई साधने (एअर अ‍ॅसेट्स) त्याचा भाग असतील, असेही संरक्षणप्रमुखांनी सांगितले.