जयपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या २०२३ साली पुन्हा मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे सांगून त्यांच्या काही समर्थकांनी एक संघटना स्थापन केली आहे. वसुंधरा राजेंची राजकीय ताकद दाखवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात असून, पक्षाच्या राज्य शाखेत असलेला विसंवाद यातून दिसून आला आहे.

‘‘वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील यापूर्वीच्या सरकारची कामगिरी व धोरणे यांचा प्रचार करण्याच्या हेतूने २० डिसेंबरला आम्ही ‘वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच’ची स्थापना केली असून, २५ जिल्ह्य़ांमध्ये पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे’’, असे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी सांगितले.

‘‘सध्या सतीश पूनिया हे पक्ष संघटनेचे नेतृत्व करत आहेत. आमच्या उपक्रमामुळे पक्ष मजबूतच होईल. ही समांतर संघटना नसून, राजे यांच्याबद्दलची आम्ही निष्ठा प्रकट करण्याचा मार्ग आहे. आम्ही केवळ त्यांच्या कामगिरीचा प्रचार करू’, असे भाजपचे सक्रिय सदस्य असल्याचा दावा करणारे भारद्वाज म्हणाले.

२०२३ साली राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचे त्यांचे समर्थक पाहू इच्छितात, असे भारद्वाज यांनी सांगितले. संघटनेच्या आयटी विभाग, महिला मोर्चा आणि युवक आघाडी यांच्यासारख्या शाखा स्थापन केल्या जातील असेही ते म्हणाले.

भाजपची प्रतिक्रिया..

ही गंभीर बाब नसून पक्षाची विचारसरणी कुठल्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी व्यक्त केली. हे केवळ समाजमाध्यमांवर आहे. त्यामागे असलेले लोक पक्षाचे मान्यताप्राप्त नेते नाहीत. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला याची पूर्वकल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले.