जगातील भूकंपांच्या माहितीसंचाचा अभ्यास करून जगात भूकंपाचे मुख्य धक्क्य़ानंतरचे धक्के कुठे बसू शकतात याचा अंदाज देणारी प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेच्या मदतीने गुगल व हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी  विकसित केली आहे. भूकंप हे साधारणपणे मालिकेने होत असतात. मुख्य  धक्क्य़ानंतर आणखी धक्के बसत असतात, त्यांचा अंदाज करणे यात शक्य आहे, असे हार्वर्ड विद्यापीठाचे फोब डेव्हराइज यांनी सांगितले.

मुख्य भूकंपापेक्षा नंतरच्या धक्क्य़ांची तीव्रता नेहमीच कमी असली तरी त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असतात. त्यामुळे अशा धक्क्य़ांचे अंदाज वर्तवणे महत्त्वाचे आहे. पण असे अंदाज वर्तवणे  खरे तर आतापर्यंत शक्य नव्हते, पण पूर्वी झालेल्या भूकंपांच्या माहिती संचाचा अभ्यास करून आता हे अंदाज करणे शक्य होणार आहे. गुगलमध्ये आम्ही यांत्रिक आकलन पद्धतीने भूकंपाच्या पश्चात धक्क्य़ांचा अभ्यास केला आहे. त्यातून पश्चात धक्के कुठे व केव्हा बसतील हे आता सांगता येऊ शकते, असे डीव्हायरीस यांनी गुगल ब्लॉगस्पॉटवर म्हटले आहे.

त्यांनी जगातील एकूण ११८ प्रमुख भूकंपांचा अभ्यास यात केला आहे. भूकंपाची माहिती न्यूरल नेटला देऊन मुख्य धक्के व पश्चात धक्के यांचा संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. यासाठी भूकंपाचे गुणधर्म बघून अलगॉरिथम विकसित करण्यात आला आहे.

पश्चात धक्क्य़ांचा अंदाज करणारे प्रारूप यातून तयार करण्यात आले आहे. अजून ते फारसे अचूक नाही, पण त्यात सुधारणा करण्यात येतील. पश्चात भूकंपाचे अंदाज एक दिवस आधी मिळाले तर मदतकार्यातील अडथळे दूर होणार आहेत. मुख्य भूकंपानंतर मदत करणाऱ्या पथकांना यातून सूचना देता येतील. भूकंप हा नैसर्गिक परिणाम असून त्याचे आकलन आणखी वाढणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.