न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे. गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रियांका राधाकृष्णन यांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “न्यूझीलंडमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना प्रियांका राधाकृष्णन यांनी मल्याळी भाषेत शपथ घेतली. भारतासाठी ही निश्चितच गर्वाची बाब आहे” या आशयाचं ट्विट करत पुरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म चेन्नईत झाला. त्यांचं बालपण सिंगापूरमध्ये गेलं आणि शिक्षण न्यूझीलंडमध्ये झालं. लग्न झाल्यानंतर त्या तिथेच स्थायिक झाल्या. जन्म चेन्नईत झाला असला तरीही त्यांचं मूळचं कुटुंब केरळचं. केरळचं पेरावुर हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचे नातेवाईक हे चेन्नईत राहतात. त्यांचे आजोबा डाव्या विचारांच्या राजकारणाशी संबंधित होते.

प्रियांका या जेव्हा संसदेत उभ्या राहिल्या तेव्हा या संसदेत माझी मातृभाषा कदाचित पहिल्यांदा उच्चारली जात असेल असं म्हणत प्रियांका यांनी भाषणाची सुरुवात केली होती. आता तो व्हिडीओ शेअर होतो आहे. जेसिंडा अर्डन यांनी पंतप्रधानपदाची शपथ गुरुवारी घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचाही शपथविधी झाला सगळ्यांनी इंग्रजी आणि माओरी भाषेतून शपथ घेतली. जेसिंडा यांच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांचा समावेश अधिक आहे, २० पैकी ८ महिला मंत्री आहेत.