नवविवाहित जोडप्यासाठी लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस खूप आनंदाचे असतात. परस्परांना समजून घेण्याचा हा काळ असतो. भविष्यासाठी अनेक सोनेरी स्वप्न रंगवली जातात. पण उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील एक जोडपं याला अपवाद ठरलं आहे.

काय घडलं?
इसानगरमध्ये राहणाऱ्या या जोडप्याचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. लग्नाला त्यांच्या पंधरवडाही उलटला नव्हता. पण त्याआधीच अगदी क्षुल्लकशा भांडणावरुन या जोडप्याने थेट टोकाचे पाऊल उचलले. घरात मटण शिजवण्यावरुन झालेल्या वादातून पती-पत्नी दोघांनी थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. आयएएनएस वृत्त संस्थेने हे वृत्त दिले आहे.

मंगळवारी उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे सोमवारी लखीमपूरच्या इसानगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. पत्नी शाकाहारी होती. पतीने स्वयंपाकघरात मटण शिजवणे तिला मान्य नव्हते. तिने पतीला स्वयंपाक घराबाहेर मटण शिजवायला सांगितले.

पण पतीने त्याच्या आईला स्वयंपाकघरातच मटण शिजव असे निक्षून सांगितले. त्यावरुन वाद वाढत गेला. अखेर दोघांनी रात्री विष प्राशन केले.

मुलाचे वडिल दोघांना खासगी दवाखान्यात घेऊन गेले. तिथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. “किचनमध्ये मांसाहारी पदार्थ शिजवण्यावरुन झालेल्या वादातून जोडप्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीची प्रकृती चिंताजनक आहे. पतीची जबानी अजून आम्ही नोंदवलेली नाही. एफआयरही नोंदवलेला नाही” अशी माहिती इसानगरचे एसएचओ सुनील सिंह यांनी दिली.