राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अद्यापही थांबवण्याचं नावच घेत नाहीये. अशातच भाजपाचे राजस्थानमधईल प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. आमदारांना जैसलमेरमध्ये नेल्याच्या माहितीवरून पूनिया यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. “आता पुढे पाकिस्तान आहे. सरकार कुठपर्यंत पळणार,” असं म्हणत त्यांनी गेहलोत यांच्यावर निशाणा साधला.

“अशोक गेहलोत हे काँग्रेसमध्ये फुट पडण्यापासून वाचवण्यासाठी जैसलमेर येथे गेले आहेत. सरकार कुठपर्यंत पळणार आहे. पुढे तर पाकिस्तान आहे. मुख्यमंत्री लोकशाही आणि राज्यघटनेविषयी बोलतात. जर त्यांच्यात ऐक्य असेल आणि भीती नसेल तर त्यांनी असं का करावं? मुख्यमंत्र्यांनी हॉटेलमधून नाही तर सचिवालयातून सरकार चालवायला हवं,” असं पूनिया म्हणाले.

“अशोक गेहलोत यांचं वक्तव्य ऐकलं की दिल्लीत जाणं कोणता गुन्हा आहे? तुम्ही पण दिल्ली मुंबई जाताच ना? आम्हीदेखील पक्षाच्या कामासाठी सतत दिल्लीत गेलो तर काय तुम्हाला सांगून जायचं का? दिल्लीत जाण्याचा अर्थ सरकार पाडणं असं म्हटलं जातं हे हास्यास्पद आहे. गेहलोत भाजपाला का दोष देत आहेत? जर सरकार पडणार आहे तर ते वाचवणं ही आमची जबाबदारी आहे का?.” असंही त्यांनी नमूद केलं. सरकार या अधिवेशनातही विरोधी पक्षाकडून उचलल्या जाणाऱ्या मुद्द्यांचा सामना करून शकणार नाही. आम्ही तैयारीनी सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहोत. यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये सरकारला उत्तरं देता आली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.

त्यावेळी आमदारांना मॅनेज केलं

“गेहलोत हे लोकशाही, संविधानाच्या गोष्टी करतात. परंतु २००८ आणि २०१८ मध्येही बसपा आणि छोट्या पक्षांच्या आधारावरच त्यांनी बहुमत सिद्ध केलं. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांनी आमदारांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. आमदारांना आता बंदीस्त करून ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण राज्य आणि देश हे पाहात आहे. जेव्हा काँग्रेसमध्ये एकी आहे, कोणतीही भीती नाही तर हे प्रकार कशासाठी केले जात आहेत?,” असंही पूनिया म्हणाले.

दगाफटका टाळण्यासाठी जैसलमेरमध्ये

राजस्थानातील सत्तारूढ काँग्रेस पक्षात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत समर्थक ५० आमदारांना शुक्रवारी तीन विमानांद्वारे जैसलमेर येथे पाठविण्यात आलं. जैसलमेर येथे रवाना होण्यापूर्वी सर्व आमदारांना जयपूर-दिल्ली महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. सर्व आमदार एकत्र राहावेत यासाठी त्यांना जैसलमेर येथे नेण्यात आल्याचे राज्याचं परिवहनमंत्री प्रताप सिंह यांनी सांगितलं.