राष्ट्रीय तपास यंत्रणेने इस्लामिक स्टेटचं मॉड्युल उध्वस्त केलं आहे. या प्रकरणात तामिळनाडू आणि कर्नाटकातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर इस्लामिक स्टेटसाठी भरती केल्याचा आणि भरती केलेल्यांना सीरिया पर्यंत पोहोचवण्यासाठी पैशाची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. अहमद अब्दुल कादीर (४०) आणि इरफान नासीर (३३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अहमद अब्दुल कादीर तामिळनाडूचा तर इरफान नासीर बंगळुरुला राहतो.

इस्लामिक स्टेटशी संबंधित तपास सुरु असताना, त्यांची नावे समोर आल्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. अहमद अब्दुल कादीर बँकेत बिझनेस अ‍ॅनलिस्ट आहे तर नासीरचा फॅमिली बिझनेस आहे. एनआयने या प्रकरणी १९ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला. एनआयएने याला ‘बंगळुरु-आयएसआयएस’ मॉड्युल म्हटले आहे.

“आयएसआयएस/आयएसआयएल या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेबरोबर संबंध ठेवल्याबद्दल तसेच इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी बंगळुरुतील मुस्लिम युवकांना प्रवृत्त करणे आणि त्यांच्या सीरियापर्यंत प्रवासासाठी पैशाची व्यवस्था केल्याबद्दल” अहमद अब्दुल कादीर आणि इरफान नासीरला अटक केल्याचे एनआयएने म्हटले आहे.

दिल्लीच्या जामिया नगरमधून काश्मीरची रहिवाशी असलेल्या हिना बाशिर बेग (३९) आणि तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीमध्ये मार्च २०२० मध्ये या दोघांची नावे आली. इस्लामिक स्टेटशी संबंध आणि सीएए विरोधी आंदोलन आयोजित केल्याच्या संशयावरुन दिल्ली पोलिसांनी हिना आणि तिच्या नवऱ्याला अटक केली होती. त्यानंतर एनआयएने त्यांची कस्टडी मिळवली. त्यांच्या चौकशीतून अहमद अब्दुल कादीर (४०) आणि इरफान नासीरचे नाव समोर आले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासात इस्लामिक स्टेटचं तथाकथित मॉड्युल उध्वस्त केलंआहे. २०१३-१४ दरम्यान बंगळुरुमधून १३-१४ जण इराक, सीरियाला गेले. त्यातले दोन जण आयएससाठी लढताना ठार झाले, तर काही जण गुपचूपपणे २०१४ साली माघारी परतले, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. अहमद अब्दुल कादीर आणि इरफान नासीरवर या मॉड्युलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे