केरळमधील तरुणांना आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत भरतीचा कट रचणाऱ्या महिलेला केरळमधील राष्ट्रीय तपास पथकाच्या (एएनआय) विशेष न्यायालयाने शनिवारी ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. केरळमधील तरुण-तरुणींना अफगाणिस्तानला पाठवल्याचा या महिलेवर आरोप आहे.


यास्मिन मोहम्मद झाहीद असे या महिलेचे नाव असून तिला ३० जुलै २०१६ रोजी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. आपल्या लहान मुलासह काबुलला जाताना तिला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले होते.

एनआयएच्या माहितीनुसार, झाहीद अफगाणिस्तानातील आपल्या सहकाऱ्याला आयसिसच्या कामासाठी मदत करणार होती. तिचा सहकारी आणि पती असलेला अब्दुल रशीद हा या प्रकरणातील पहिला आरोपी आहे. सहा महिला आणि तीन लहान मुलांसह २२ केरळच्या नागरिकांना भारतातून अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळावर पाठवण्यात आल्याची माहिती झाहीदने सन २०१६मध्ये एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान दिली होती.