वादग्रस्त इस्लामी धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईकविरोधात पुरावे नसल्याचे सांगत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला. झाकीर नाईकशी संबंधीत माहिती हटवावी, असे निर्देश इंटरपोलने सर्व कार्यालयांना दिले असून या निर्णयामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांना हादरा बसला आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात झाकीर नाईकविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करावी, यासाठी भारताने इंटरपोलकडे अर्ज केला होता. मात्र भारताची विनंती फेटाळून लावत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला. झाकीर नाईकविरोधात अजून आरोपपत्र दाखल नसून नियमानुसार फक्त संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे.

विशेष म्हणजे एनआयएने ऑक्टोबरमध्ये झाकीर नाईकविरोधात ४ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात आपल्या चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करण्यासह बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करण्याचा प्रमुख आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था आणि हार्मोनी मीडिया या कंपनीविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रात १५० साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांचा समावेश होता.

इंटरपोल निर्णयावरुन त्यांना आरोपपत्राची माहिती देण्यात आली नाही, असे दिसते. आम्ही आरोपपत्राबाबतचा तपशील इंटरपोलला देऊ, अशी माहिती एनआयएमधील सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे झाकीर नाईकने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांअभावी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याने मी निर्धास्त झालो, आता भारतीय सुरक्षा यंत्रणाही खोट्या गुन्ह्यातून मला मुक्त करतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.