ईशान्येकडील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारने माजी सनदी अधिकारी एम. पी. बेझबारूआ यांच्या अध्यक्षतेखाली एका सहासदस्यीय समितीची स्थापना केली आहे. अरुणाचल प्रदेशातील एका विद्यार्थ्यांचा दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर या भागातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये एचडब्ल्यूटी साइम, ए. टी. जमिर, टी. बागरा आणि पी. भारत सिंग या माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्रालयातील उपसचिव एस. साहा हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (प्रभारी उत्तरपूर्व राज्ये) सरचिटणीस लुइझिनो फालेरो यांनी सांगितले.
समितीचे प्रमुख बेझबारूआ हे उत्तरपूर्व कौन्सिलचे सदस्य असून त्यांना आपला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हल्ल्यांमागील कारणे काय, सापत्नभावाची वागणूक का देण्यात येते याबाबत समिती आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे. फालेरो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर फालेरो यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित होते. उत्तरपूर्व भागातील जनतेचा होणारा छळ थांबविण्यासाठी कोणती पावले उचलता येणे शक्य आहे, त्याबाबतही या वेळी चर्चा झाली. लाजपतनगर येथील काही दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या आमदारांचा मुलगा निदो तानिम याचा मृत्यू झाला. त्यानंतर या भागात संतापाची लाट पसरली असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्लीचे पोलीस सहआयुक्त रॉबिन हिबू हेही त्याच भागातील असून त्यांना समितीला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यापूर्वी, उत्तरपूर्वेकडील जनतेला देण्यात येणारी सापत्नभावाची वागणूक थांबविण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी गुरुवारी या क्षेत्रातील खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन केली. तक्रार निवारण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीपुढे आपले म्हणणे मांडण्याची सूचना पंतप्रधानांनी या वेळी खासदारांना केली.