नायजेरियातील लेगोस येथे तीन मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून 36 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकली असावीत, असा अंदाज आहे. ही इमारत अनधिकृत होती, अशी माहिती देखील समोर आली असून या अनधिकृत इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर शाळा, तिसऱ्या मजल्यावर घरं होती. तर इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने होती.

लेगोस ही नायजेरियातील आर्थिक राजधानी असून लेगोसमधील इताफजी परिसरात तीन मजली इमारत होती. ही इमारत मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून रात्रीपर्यंत 35 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये शाळेतील लहान मुलांचाही समावेश आहे. इमारत अनधिकृत होती आणि वर्षभरापूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इमारत कोसळल्याची बातमी समजताच मुलांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून मुलांना काढल्यावर पालकांची धावाधाव सुरु होती. तुम्ही विचार करा, सकाळी माझी मुलं शाळेत आली. आमचं घर शाळेपासून जवळच आहे. आता आम्ही मुलांना ढिगाऱ्या खाली शोधतोय. हे खूप दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने स्थानिक माध्यमांना दिली. मुलांच्या आठवणीने त्या महिलेला रडू आवरता येत नव्हती. अनेक पालकांची हीच स्थिती होती. दरम्यान, नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.