जम्मूहून निघालेल्या झेलम एक्‍सप्रेसचा मंगळवारी सकाळी पंजाबमध्ये अपघात झाला. लुधियानातील फिलोर येथे झेलम एक्स्प्रेसचे नऊ डबे रूळांवरून खाली घसरले. या अपघातात आतापर्यंत दोनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. फिल्लोर गावाजवळ मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान ही दुर्घटना घडली. तब्बल दोन किलोमीटरच्या परिसरातील रेल्वे रूळ उखडला गेल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी बचावपथके दाखल झाली असून त्यांच्याकडून मदतकार्य सुरू झाल्याची माहिती अतिरिक्त महासंचालक अनिल सक्सेना यांनी दिली. या दुर्घटनेमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जालंधर- दिल्ली, अमृतसर- दिल्ली इंटरसिटी, अमृतसर- हरिद्वार जनशताब्दी एक्स्प्रेस, अमृतसर-चंदीगढ सुपरफास्ट एक्सप्रेसचा समावेश आहे.
झेलम एक्‍सप्रेस जम्मुहून पुण्याच्या दिशेने येत होती. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना लुधियातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतलज ब्रीजजवळ आल्यानंतर रेल्वेचे बी ५, एस१, पीसी, एस २, एस ३, एस ४, एस ५, एस ६, एस ७ आणि एस ८ ही दहा डबे रूळावरून घसरले आहेत.