पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार ५०० कोटींचा चुना लावणारा नीरव मोदी अखेर भारताला सापडला आहे. त्याने रडरडत मी घेतलेले सगळे कर्ज परत करतो हवे तर माझ्या सगळ्या मालमत्ता विकतो पण मला फरार, कर्जबुडव्या, पळपुट्या अशी लेबल्स लावू नका अशी विनंती केल्याचेही समजते आहे. नीरव मोदीला अटक करण्यात आली आहे त्याचा मामा आणि बिझनेस पार्टनर मेहुल चोक्सी यानेही शरणागती पत्करली आहे. हे सगळे काही शक्य झाले आहे ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे. अमिताभ बच्चन काही कामानिमित्त बेल्जियम या ठिकाणी गेले होते. नीरव मोदीला ही गोष्ट समजली. कारण ज्या उंची हॉटेलमध्ये नीरव मोदी थांबला होता तिथेच अमिताभ बच्चन यांचेही काही खासगी काम होते. अमिताभ बच्चन यांना पाहताच नीरव मोदी त्यांच्या जवळ गेला. त्याने अमिताभ बच्चन यांचे पाय धरले. देशाचे एवढे मोठे नुकसान केले याबद्दल मी तुमची आणि देशाची माफी मागतो. कृपा करा आणि मला माफ करा असे म्हणत नीरव मोदी हा स्टीव स्मिथपेक्षाही मोठमोठ्याने रडू लागला.

मी हिरे व्यापारी आहे.. मला पळपुट्या, कर्जबुडव्या, ४२० ही विशेषणे लावून मीडियाने बदनाम केले आहे. मी कर्ज घेतले आणि ते मी काहीही झाले तरीही परत करणारच अशी प्रतिज्ञा त्याने अमिताभ बच्चन यांच्यासमोर घेतली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना त्यांनी नीरव मोदी देशात परत येऊ इच्छितो आणि त्याने माझी तुमची, अमित शहांची, भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांची, पीएनबी संचालक मंडळाची आणि या सगळ्यासोबत देशाचीही माफी मागितली आहे असे सांगितले. नीरव मोदी इतका भावुक झाला, स्वतःहून शरण आला हे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही डोळे पाणावले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी ही बातमी तातडीनी सांगितली.

अमित शहांनी क्षणाचाही विलंब न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीरव मोदीला भारतात आणत आहेत ही बातमी मीडियाला सांगत अख्ख्या दिल्लीत हत्तीवरून ढोकळा, जिलेबी आणि फाफडा वाटला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरीही प्रत्येकी १० किलो ढोकळा, जिलबी आणि फाफडा यांचे पार्सल पाठवले. अमित शहांकडून पार्सल आलेले पाहून राहुल गांधींना वाटले कर्नाटकची निवडणूकच भाजपा निकालांच्या आधीच जिंकले की काय? पण नंतर त्यांना कोणीतरी सांगितले की अहो नीरव मोदी शरण आला आहे. मग त्यांनीही भाजपाच्या आनंदात सहभागी होत मनसोक्त ढोकळा, जिलबी आणि फाफडा खाल्ला. इकडे नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि अमिताभ बच्चन हे खास चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला उतरले. त्यांच्यासोबत पोलीस आणि इंटरपोलचे लोक होतेच.

 

पोलिसांसोबत जाण्याआधी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नरेंद्र मोदींच्या पायावर डोके ठेवून या दोघांनीही नाक घासले. मग नरेंद्र मोदींनी या दोघांचेही कान धरून त्यांना उठवले, गालावर दोन चापट्या मारून पुन्हा असे कराल तर याद राखा असा दमही दिला त्यानंतर त्यांना सांगितले की आता पोलिसांसोबत जा जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करा आणि पीएनबीचे सगळे कर्ज फेडून टाका. मग पडत्या फळाची आज्ञा घेत या दोघांनी तिथून काढता पाय घेतला. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला यांना आता न्यायालयात हजर केले जाईल. हे दोघे निघून गेल्यावर अमिताभ बच्चन यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. त्यांच्यासोबतही ढोकळा, जिलेबी आणि फाफडा याचे पार्सल पाठवले आणि देशासाठी तुम्ही असेच उपयोगी पडा! यापुढे भाजपाच्या प्रत्येक जाहिरातीत तुम्हाला झळकायचेच आहे हे लक्षात ठेवा असे सांगितले. ज्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कारमध्ये बसताना डोक्यावर हात मारून घेत, ‘कुठून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला पकडून देण्याची बुद्धी मला झाली’ असे म्हटल्याचे समजले आहे.

(सदर बातमी एप्रिलफूल आहे. भविष्यात खरोखर असे काही घडले तर तो योगायोग समजावा)