पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीला ६ वर्षात १२१३ लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज देण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिली. पीएनबीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ९४२ कोटींचाही एक घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे घोटाळ्याची एकूण रक्कम १३ हजार ६०० कोटींच्या घरात गेली आहे असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांनी पीएनबीतून लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवले. त्याच आधारे विदेशातील काही भारतीय बँकांकडून कर्ज घेतले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असा लौकिक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीने एका दिवसात ५ वर्षांची गॅरंटी मिळवली. या सगळ्या वर्षांच्या कालावधीत नीरव मोदीला ५३ ओरिजनल एलओयूजही देण्यात आले होते असेही सांगितले. ५ मार्च २०११ ला पहिले लेटर आणि ६ नोव्हेंबर २०१७ ला शेवटचे लेटर देण्यात आले. बँकेला चुना लावण्यासाठी एक वर्षाची मुदत असलेल्या एलओयूजचा वापर करण्यात आला असेही जेटली यांनी सांगितले आहे.

ज्वेलर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांनीही बनावट एलओयूजच्या मदतीने पीएनबीला १३ हजार ६०० कोटींचा चुना लावला. चोक्सीची कंपनी असलेल्या गीतांजली ग्रुपने ७,०८०. ८६ कोटींचा घोटाळा केला तर बाकी रकमेचा घोटाळा नीरव मोदीच्या कंपनीने केला अशी माहिती जेटली यांनी दिली.