निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आता चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. अशात फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र दिल्ली हायकोर्टाने दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. आरोपींचे वकील ए.पी. सिंग यांना कोर्टाने झापलं आहे. तुम्ही जे काही दावे करत आहात आणि जी याचिका दाखल केली आहे त्याला काहीही अर्थ नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच आम्ही रात्रीचे १० वाजून गेले आहेत तरी इथे बसलो आहोत. आता तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे ते सांगा मात्र त्यात काहीतरी तथ्य हवं असंही कोर्टाने म्हटलं आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनी न्यायालयाकडे आणखी दोन ते तीन दिवसांची वेळ मागितली. जी कागदपत्रं जमा करायची होती त्यासाठी मला हा वेळ हवा असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. मात्र न्यायलयाने त्यांचं हे म्हणणं ऐकून घेतलं नाही. रात्रीचे १०.४५ वाजून गेले आहेत. पहाटे ५.३० ला फाशी द्यायची आहे. काही महत्त्वाचं आणि ठोस मुद्दे असलेलं काही असेल तर आम्हाला सांगा असं न्यायलयाने सिंग यांना सांगितलं. मला वेळ मिळाला तर मी सगळ्या गोष्टी समोर ठेवेन असं जेव्हा सिंग म्हणाले तेव्हा न्यायालयाने सांगितलं डेथ वॉरंट लागू झाले आहेत. चौथ्यांदा डेथ वॉरंट लागू करण्यात आले आहेत त्याचं काहीतरी पावित्र्य ठेवा असं म्हटलं होतं. तसंच कोणताही ठोस मुद्दा न आढळल्याने ही याचिका फेटाळून लावल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.