निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी दिल्ली न्यायालयाने कायम ठेवण्याचा निकाल आज दिला. २२ जानेवारी रोजी, सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने आरोपींना जारी केलेल्या ब्लॅक वॉरंटचे मी स्वागत करतो मात्र सरकारने आता अधिक खबरदारी घ्यायला हवी, असं निकम यांनी म्हटलं आहे.

निश्चितपणे ब्लॅक वॉरंट जे निघालं आहे, त्याचं मी स्वागत करतो. कारण, आरोपींनी ज्या क्रुरपणे निर्भयाची बलात्कारकरून हत्या केली होती. ती बघता हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. परंतु, डेथ वॉरंट हे २२ जानेवारीचं आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अनुषंगाने सरकारला ही खबरदारी घ्यावी लागेल, की पुन्हा या दरम्यान आरोपीच्यावतीने डेथ वॉरंटला स्थगिती देण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणून आपल्याला आता यापुढे कायद्यात काही विशेष सुधारणा देखील करावी लागणार आहे. कारण, निर्भयाच्या खटल्याचा निकालाला जवळजवळ चार ते पाच वर्षे उलटलेली आहेत. मात्र, अद्यापर्यंत त्यांना फाशी दिली गेली नाही. अर्थात आरोपीला देखील बचावाची पूर्ण संधी मिळाली. हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून आता या डेथ वॉरंट नंतर निश्चितपणे आरोपींना फासावर चढवले जाईल, यामध्ये शंका नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सरकारला देखील याबाबत काळजी घ्यावी लागेल. जेणेकरून या डेथ वॉरंटला पुन्हा एकदा स्थगिती मिळून, पुन्हा खटल्याची सुनावणी लांबणीवर पडू नये हीच इच्छा, असल्याचे उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.