केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेची दखल घेणे केंद्रीय मंत्र्यांना भाग पडत आहे. ‘शेतकऱ्यांनी परमेश्वर आणि सरकारवर विसंबून राहू नये’, असे विधान केले नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभेत दिले.
सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितिन गडकरी यांच्या विधानाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यावर नियम ३५७ अंतर्गत गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले. अमरावती येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांवर सतत संकटे येत आहेत. परंतु त्यांनी हताश होऊ नये. आत्महत्येचा पर्याय निवडू नये. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. केवळ परमेश्वर व सरकारवर विसंबून राहू नये. सरकार आपले काम करीत आहे. पण शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावयास हवे. याच प्रयोगांमधून शेतकऱ्यांनी स्वतचे सामाजिक व आर्थिक उत्थान करावे. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले.