बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालपद रद्द करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. सध्याच्या संघराज्य लोकशाही रचनेत राज्यपालपद कायम ठेवणे गरजेचे नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार बरखास्त केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर जोरदार टीका केली त्या पाश्र्वभूमीवर नितीशकुमार यांनी शनिवारी आंतरराज्यीय परिषदेत राज्यपालपद रद्द करण्यास अनुकूलता दर्शविली. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत तेथील राज्यपाल केंद्र सरकारच्या आदेशावरून राजकीय कारभार करीत असल्याचा आरोपही काही राज्यांनी केला आहे.

सदर घटनात्मक पद रद्द करणे शक्य नसल्यास राज्यपालांचे अधिकार काही प्रमाणात कमी करावे, राज्यपालांची नियुक्ती करण्यासाठी अथवा त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, असे मतही नितीशकुमार यांनी व्यक्त केले.

राज्यपालपद रद्द करणे शक्य नसल्यास राज्यपालांची नियुक्ती करण्याबाबतच्या तरतुदी सुस्पष्ट आणि पारदर्शक असाव्यात. राज्यपालांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात यावी. सरकारिया आयोगाने आखलेल्या निकषांचे पालन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.