बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पाचव्यांदा विराजमान होणाऱ्या नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी उपस्थित राहणार आहेत. नितीशकुमार यांनी या सोहळ्यासाठी स्वतः फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते. मात्र, ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
राजशिष्टाचाराप्रमाणे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांना निमंत्रित केले जाते. त्यामुळेच नितीशकुमार यांनी मोदींना फोन करून त्यांना निमंत्रण दिले होते, असे जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ट नारायण सिंग यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी मोदींना निमंत्रण दिले होते. त्या सोहळ्याला मोदी उपस्थित राहिले नव्हते, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केले.
उद्या शुक्रवारी नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई आणि रामदास कदमही या सोहळ्याला जाणार आहेत.