बिहारमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे भाजपाकडून वारंवार हे सांगितलं जात आहे की, नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. तर, दुसरीकडे केंद्रातील एनडीएचा सहकारी पक्ष लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान सातत्याने नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. आता, लोक जनशक्ती पार्टी जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.

”जर आम्ही सत्तेत आलो, तर नितीश कुमार आणि त्यांचे अधिकारी गजाआड असतील.” असं चिराग पासवान यांनी आज एका रॅलीत बोलताना म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान बक्सरमधील एका रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राज्य सरकारसमोर विविध प्रश्न देखील उपस्थित केले.

“मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, ज्या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तिथे #बिहार1stबिहारी1st लागू करण्यासाठी लोजपाच्या उमेदवारांना मतदान करा व अन्य सर्व ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना मत द्या. येणारे सरकार हे नितीश कुमार मुक्त सरकार असेल.” असं चिराग पासवान म्हणाले आहेत.

बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत आहे. यावरून नितीश कुमारांवर टीका होत असल्याचंही चिराग पासवान यांनी यावेळी सांगितलं. नितीश कुमार मुक्त सरकारसाठी लोक जनशक्ती पार्टीने भाजपा समर्थकांकडे देखील मतं मागितली आहेत.