लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर एकामागोमाग एक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मोदी सरकारनं ठराविक उद्योजकांचे अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र हेच सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही असा आरोप राहूल गांधींनी केला. संपूर्ण जगात पेट्रोलचे भाव घसरत असताना भारतात मात्र ते वाढतच असल्याचंही राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना ते शक्य नाही असं अर्थमंत्री सांगतात अशी टीकाही गांधी यांनी केली.

भाषणाची सुरुवात करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर ‘जुमला स्ट्राईक’ करणारं आहे असा टोला मारला. शेतकरी, तरुण, बेरोजगार या जुमला स्ट्राइकचे पीडित ठरले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील हा पहिला जुमला. २ कोटी तरुणांना रोजगार मिळेला हा दुसरा जुमला होता. फक्त ४ लाख तरुणांना रोजगार मिळाला आहे. जिथे जाईल तिथे रोजगाराबद्दल बोलतात. कधी म्हणतात भजी तळा, दुकानं खोला. चीन २४ तासात ५० हजार युवकांना रोजगार देतो, मात्र तुम्ही २४ तासात अवघ्या ४०० युवकांना रोजगार देतो असंही ते म्हणाले.

उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्केटिंगचा खर्च करतात असे सांगताना राहूल गांधींनी मोदींमुळे काही उद्योगपतींचा बराच फायदा झाल्याचा आरोप केला. पंतप्रधान हे चौकीदार नसून भागीदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींवर घणाघाती टीका करताना चीनचे राष्ट्रपती व मोदी जेव्हा अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसले होते त्यावेळी चिनी सैनिक डोकलाममध्ये भारतात घुसले होते असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही उद्योगपतींचे जवळचे संबंध असून ते सगळ्यांना माहिती आहेत. मोदींच्या निर्णयामुळे या उद्योजकांना ४५ हजार कोटींचा फायदा झाल्याचा दावा राहूल गांधींनी केला आहे. पंतप्रधानांनी ठराविक उद्योगपतींना का सहाय्य केली याचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदी आता माझ्या डोळ्यात बघू शकत नाहीत असे ते म्हणाले.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी माझं बोलणं झालं असून राफेल संदर्भात भारताशी फ्रान्सचा कुठलाही करार झाला नसल्याचं त्यांनी सांगितल्याचं राहूल गांधी म्हणाले. राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीवरून संरक्षम मंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान देशाची दिशाभूल करत असल्याची टीका राहूल यांनी केली. भाजपावर राहूल गांधी यांनी घणाघाती टीका केली आहे. संरक्षण मंत्री यांनी खोटी माहिती दिल्याचे गांधी म्हणाले.

कुठून मेसेज मिळाला माहित नाही आणि पंतप्रधानांनी रात्री नोटाबंदीचा निर्णय घेऊन टाकला. गरिब लोक, कामगार रोख पैशावर काम करतात. सूरतमधील गरिबांनी मोदींच्या निर्णयाचा फटका आम्हाला बसला असल्याचं सांगितलं. पंतप्रधानांची चर्चा छोट्या दुकानदारांशी नाही तर फक्त सूट बूटमधील लोकांशी होत असते असा टोला राहुल गांधींनी लगावला.