आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस तसेच तेलंगणामध्ये आरक्षणाशी निगडीत मुद्द्यावरून तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सदस्यांनी सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सुरूवातीला दुपारी १२ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाजास सुरूवात होताच पुन्हा विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत (दि.२०) स्थगित करण्यात आले. तर दुसरीकडे राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करता आला नाही.

https://twitter.com/ANI/status/975622822293893120

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मागील दोन आठवड्यांपासून गोंधळामुळे कामकाज होऊ शकलेले नाही. मंगळवारी सलग ११ व्या दिवशी प्रश्नोत्तराचा वेळ गोंधळात निघून गेला. आज कामकाज सुरू होताच टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसचे सदस्य घोषणा देत अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना आपल्या आसनावर परत जाण्यास सांगितले. पण हा गोंधळ थांबला नाही. त्यानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज एक तासासाठी स्थगित करण्यात आले.

https://twitter.com/ANI/status/975621972112617472

टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसचे सदस्य ‘वी वाँट जस्टिस’ च्या घोषणा देत होते. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यापासून लोकसभेच्या कामकाजात पीएनबी घोटाळा, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या तसेच तेलंगणातील आरक्षणाच्या मागणीवरून रोज अडथळे येत आहेत.

दरम्यान, यापूर्वी शुक्रवारी या दोन्ही पक्षांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव सादर होऊ शकला नव्हता. शुक्रवारी टीआरएस, एआयडीएमकेसमवेत इतर पक्ष हे विविध मुद्यांवर सदनाच्या वेलमध्ये येऊन गदारोळ करत होते. दोन्ही पक्ष दुसऱ्या विरोधी पक्षांनाही अविश्वास प्रस्तावासाठी पाठिंबा मागत आहेत. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान ५० खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. काँग्रेस, डीएमके, सपाशिवाय डाव्या पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारला अविश्वास नामंजूर होण्याचा पूर्ण विश्वास आहे.

https://twitter.com/ANI/status/975613923570454528

https://twitter.com/ANI/status/975607845466107904